आपण बऱ्याच वेळा कृषी तज्ञांच्या तोंडून / लिखाणातून… ” कर्ब – नत्र ” या शब्दांविषयीचा उल्लेख ग्रहण अथवा वाचन केला असेलच…. ! तर , मग काय आहे ही “कर्ब – नत्र ” भानगड ? अन् तीचे जमीन सकस करणाऱ्या हयूमस निर्मितीत योगदान ते काय ? या विषयीचे थोडंसं गुह्यत्तम वर्म “घागर में सागर” या उक्ती मागचे तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ….. !
सर्वप्रथम सेंद्रीय कर्ब व सेंद्रीय नत्र म्हणजे काय ते समजावून घेऊया .
सेंद्रीय कर्ब म्हणजे वनस्पती , प्राणी व जीवाणू ह्या सजीवांच्या अवयवांना कुजवून मोकळा झालेला त्यातील कर्ब होय . तसेच- सेंद्रीय नत्र म्हणजे सुध्दा वनस्पती , प्राणी व जीवाणूंच्या अवयवांना कुजवून मोकळा झालेला त्यातील बंदिस्त नत्र किंवा नत्र स्थिरक जीवाणूंनी जमिनीत साठविलेला हवेतील नत्र होय ! शेतातील पिकांना सर्वकष पोषणासाठी अति आवश्यक असणाऱ्या जीवद्रव्य / हयूमस निर्मितीसाठी काही निसर्गनियम आहेत. जीवन द्रव्यात म्हणजे हयूमस मधे जेव्हा १० किलो सेंद्रीय कर्ब जमा क़रायचा असेल तर त्यासाठी हया सेंद्रीय कर्बासोबत १ किलो सेंद्रीय नत्र जमा केला पाहिजे. तरच ते जीवन द्रव्यात साठवून राहतात, थांबतात .
म्हणजेच सूक्ष्म जीवाणू सेंद्रीय पदार्थांना कुजवून जी मोकळी झालेली अन्नद्रव्ये विशेषत : सेंद्रीय कर्ब व सेंद्रीय नत्र ही १o:१ हया परस्पर प्रमाणात हयुमस नावाच्या बॅकेत जमा करायला हवा . ह्या सेंद्रीय कर्ब व सेंद्रीय नत्र ह्याच्या दाट मैत्रीच्या हयूमसमध्ये जमा होण्याच्या किंवा एकमेकांशी बांधून घेण्याच्या परस्पर प्रमाणालाच कर्ब : नत्र गुणोत्तर ( C: N रेशो ) असे म्हणतात .
आम्ही विविध पिकात जेव्हा कडधान्य वर्गीय कर्ब : नत्र गुणोत्तर कमी असलेल्या म्हणजेच कर्ब : नत्र गुणोत्तर १० : १ या प्रमाणाशी मेळ असलेल्या द्विदल धान्य पिकांचे काष्ठआच्छादन करतो . तेव्हा हयूमस निर्मितीचा वेग अधिक असतो .
याउलट .. एकदल पिकांच्या शरिरात मात्र नत्र कमी व कर्ब मोठया प्रमाणात असतो .
एकदल पिकाच्या आच्छादनाचे कर्ब : नत्र गुणोत्तर १२० आहे ह्याचा अर्थ त्यात केवळ १ किलो सेंद्रीय नत्र आहे १२० किलो सेंद्रीय कर्ब . म्हणजेच हयूमस निर्मितीसाठी १२० किलो कर्ब उपयोगात आणायचा असेल तर हयूमसनिर्मिती नियमानुसार १२ किलो नत्र पाहीजे. ह्याचा अर्थ हया १ किलो सेंद्रीय नत्रासोबत १२० किलो पैकी फक्त १० किलोच सेंद्रीय कर्ब ह्यूमस नावाच्या रिजर्व बँकेत जमा होईल व उरलेला ११० किलो सेंद्रीय कर्ब त्याच्याशी युती करायला सेंद्रीय नत्र उपलब्ध नसल्याकारणाने निसर्ग नियमानुसार जेथून आला तेथे वातावरणात प्राणवायूशी संयोग पावून कर्बाम्ल वायूचे स्वरूपात हवेत निघून जाईल .
आता हा महागमोलाचा सेंद्रीय कर्ब जमिनीत साठलाच नाही तर जीवाणूंना तो कोठून मिळणार ? मग त्यांची संख्या व कुजण्याची क्रिया कशी वाढेल ? मग पिकांना अन्न कसे उपलब्ध होईल ?
म्हणूनच जर एकदल आच्छादनातील हा उरलेला ११० किलो सेंद्रीय कर्ब हयूमसमध्ये साठवायचा असेल तर आणखी ११ किलो नत्र एकदल आच्छादनात असला पाहिजे. हा नत्र सजीवांच्या अवयवांच्या कुजण्यातून आलेला पाहिजे. युरियामधील नत्राला कर्ब व ह्यूमस स्वीकारत नाही.
म्हणजे हा ११ किलो सेंद्रीय नत्र आपल्याला कडधान्यवर्गीय द्विदल पिकांच्या अवशेषांना (शरीराला) एकदलवर्गीय अवशेषांसोबत कुजवून मिळवला पाहिजे . त्यासाठी एकदलामध्ये द्विदलवर्गीय पिकांचे अवशेष मिसळायला हवे. त्याशिवाय कोणताही उपाय नाहीच !
मग आम्ही तर…कडधान्य पिकांचे भूस ( कुटार ) आच्छादनासाठी वापरणार नाही कारण ते सर्व आम्हीं आपल्या बैल, गायी, म्हैस इ. पाळीव गुरांना खाऊ घालणार… !
तर मग करायचे काय…. ?
मग ह्या कर्ब : नत्र (१०:१ ) समीकरणाच्या योग्य यशस्वीतेसाठी, विनासायास सतत उपलब्धतेसाठी आम्हांस एकदल पिकांमध्ये द्विदल व द्विदल मध्ये एकदल आंतरपिक पद्धतीने पेरणी करावी लागेल. त्या आंतरपिकांनी केलेली पानगळ, फुल- कळयांची गळ, खोडगळ, काष्टगळ, फळगळ व मूळांचे जमिनीतील मोठे जाळे सतत जमिनीवर साठवून हयूमस निर्मितीस आवश्यक सेंद्रीय नत्र सेंद्रीय कर्बाच्या प्रमाणात साठविला जाईल. त्यामुळे हयूमस निर्मितीस्तव आवश्यक कर्ब: नत्र ( १०:१ ) गुणोत्तरही साध्य होईल.
त्यास्तव वरील सर्व आशय आम्हीं सर्व निसर्ग शेती वारकऱ्यांनी काळजीपूर्वक समजावून घेऊन विविध पीक / फळबागमध्ये आच्छादन करतांना केवळ एकदलवर्गीय आच्छादन न करता त्यात द्विदलवर्गीय कडधांन्याचे आच्छादनही मिसळून व आपली जमीन हयूमस रुपी जीवनद्रव्यानं भरूया…