वास्तविक निसर्ग ही एक परिपूर्ण रचना आहे. त्यात काही फुकट मिळत नाही व फुकट जातही नाही. निसर्ग नावाच्या वादळाने कोंकणात घडले आहे ते फार भयानक आहे. कदाचित निसर्गावर मात करण्याच्या मानवाच्या सुप्त आकांक्षेला एक जोरदार झटकाच निसर्ग वादळाने दिला आहे, आता तरी सुधर..!!
कोंकणातील नगदी पिके सुपारी, नारळ, आंबा व काजू. या मधील सुपारी व नारळ बागांचे खूप नुकसान म्हणजे काही बागा तर पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. अशा बागांवरच ज्यांची उपजीविका अवलंबून आहे त्यांचे जगण्याचे साधनच नष्ट झाले आहे. सुपारी, नारळ बाग पुन्हा उभी करणे तर आवश्यक आहे. पण सुपारी नारळ बाग लागवडी पासून उत्पादनक्षम बाग तयार होण्याचा कालावधी हा किमान ६ वर्ष.
या ६ वर्षात बागेची मेहनत केली तर नंतर उत्पन्न, अश्या या ६ वर्षात जगण्यासाठी ही पैशाची गरज आहेच.
या सर्व पार्श्वभूमी वर तात्काळ व दीर्घकालीन नियोजन व नियोजित कार्यासाठी विविध प्रकारच्या व विविध टप्यांवर मदतीची गरज आहे. आपत्कालीन आवश्यक मदत समाधानकारकरीत्या समाजातील विविध घटकांनी केली. आता दीर्घकालीन नियोजन व त्याकरिता आवश्यक मदत आपत्कालीन मदती इतकीच गरजेची आहे.
निसर्ग वादळातून सावरण्यासाठी निसर्ग सहयोग अभियान हे सजग नागरिकांच्या सहभागातून तयार झालेला एक उपक्रम आहे. अन्नधान्य,छत, छप्पर या साठी सामाजिक बांधीलकी सहयोग करत होतीच. उध्वस्त बागांमधील झाडांच्या कचऱ्याचे ढीग उस्तरणे एक आव्हान होते. त्या करिता सहाय्यभूत अशी सहा श्रेडींग मशीन अभियानाच्या माध्यमातून देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्या योगे कचऱ्यातून कमाई, खतनिर्मीती सुरू झाली आहे. या खताचा त्याच बागातून विनियोग होणार आहे व पुढील टप्याची ही तयारी आहे.
एकाच उत्पन्नावर आधारित सुपारी, नारळ, आंबा, काजू या बागांच्या शाश्वत विकासाचा मूलभूत विचार मांडताना आंतरपीक पद्धतीचा वापर करणे अनिवार्य ठरते.
पहिल्या टप्पावर सुपारी व नारळ बागांचा विचार, कारण या बागांतून सिंचन सुविधा उपलब्ध आहे. जमिन कसलेली, समतल आहे. थोडक्यात कृषी साठी पायाभूत सुविधा तयार आहेत त्या साठी लागणारी फार मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही. कोठे किरकोळ दुरुस्ती लागेल.
बहुवर्षीय पिकातील आंतरपिक हे कमी कालावधीचे असावे जेणे करून वर्षभरात मुख्य पिकाव्यतिरिक्त दोन तीन वेळा काही उत्पन्न मिळावे. शिवाय सध्याच्या तात्काळ आर्थिक गरजेच्या दृष्टीने ही आंतरपिकाची निवड गरजेची आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन पचौली या सुगंधी वनस्पतीची आंतरपिकासाठी निवड केली आहे. वरील मुद्यांव्यतिरिक्त कोंकणात शाकीय वाढ चांगली होते तसेच जमीन आम्ल धर्मीय असल्याने सुगंधी वनस्पतिसाठी पूरक आहे. या दोनही गोष्टी पचौली पिकासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या आहेत.
पचौली लागवड सातत्याने तीन वर्षापर्यंत फायदेशीर पीक देते व कोंकणात वर्षातून तीन पिके सहज घेता येतात. याची लागवड थोडी खर्चिक आहे. त्या करीता आर्थिक सहाय्याची एकदाच गरज आहे.
लागवडी पासून चौथ्या महिन्यात पहिले पिक मिळते म्हणजेच आर्थिक आवक सुरू होते. इतके सर्व फायदे आहेत मग या आधी लागवड का झाली नाही ?
१ ) सुपारी, नारळ बागांची लागवड अति सघन होती त्या मधे लागवडीस वाव कमी होता तसेच
२ ) याचे उत्पादन म्हणजे पाने युक्त डहाळ्या. त्या सावलीत सुकवून तेल काढणाऱ्या कंपनीला पुरवावयाच्या. खूप जागा व्यापणारे हे पाला उत्पादन वहातूक खर्चिक असल्याने फायदेशीर ठरत नव्हते.
या अडचणीच्या पाश्र्वभूमी वर तोडगा म्हणून आता तेल काढण्याची छोटी व कमी किंमतीची सयंत्रे उपलब्ध आहेत. असे सयंत्र गांवातच कार्यान्वित करून येणारे सुगंधी तेलच आता कंपन्या विकत घेतात.
निसर्ग वादळात उध्वस्त शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर ठेवण्याची क्षमता या उपक्रमात निश्चीतच आहे हे वरील विवेचना वरून लक्षात आले असेलच. शिवाय आणखी दोन नाविन्यपूर्ण बाबी या मधून साधणार आहेत.
१ ) बहूवर्षीय बागांतून कमी कालावधीची आंतरपिके घेऊन शाश्वत शेती करून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविणे.
२ ) रत्नागिरी जिल्ह्यात सुगंधी वनस्पती, वनौषधी वनस्पतींची असणारी अपार शक्यता प्रस्थापित करणे.
निसर्ग सहयोग अभियानात आपला सहयोग खूप मोलाची भर घालू शकतो.
शुभम् मंगलम् !
विनायक.
( महाजन काका )