माती करूया सुपीक!

By | September 4, 2020

या लेखामध्ये आपण माती परीक्षणाच्या काही सोप्या पद्धती तसेच जमीन प्रदूषणाची कारणे व उपाययोजना याविषयी माहिती घेऊ या.

आपल्या शेतातल्या मातीमध्ये खत घालण्याची गरज आहे का नाही हे पाहण्याकरिता मातीचा कस तपासण्याच्या काही साध्या, सोप्या सहज करता येतील. अशा काही पद्धती खाली दिल्या आहेत.

मातीचा एक मूलभूत गुणविशेष म्हणजे मातीची घडण. सर्वसाधारणपणे, मातीचे वर्गीकरण चिकणमाती, रेताड माती किंवा मिश्र माती (जिच्यात गाळ, वाळू, चिकणमाती यांचे योग्य मिश्रण असते) अशी केली जाते.

चिकणमातीमध्ये भरपूर पोषणद्रव्ये असतात. पण तिच्यात पाण्याचा निचरा फार सावकाश होतो. रेताड मातीत पाणी चटकन झिरपते. पण ती पोषणद्रव्ये किंवा ओलावा धरून ठेवू शकत नाही. मिश्र माती ही सर्वसाधारणपणे योग्य माती समजली जाते. कारण ती पोषणद्रव्ये धरून ठेवू शकते. पाण्याचा निचरासुद्धा चांगला होतो.

माती दाबून मातीचा प्रकार ओळखण्याची परीक्षा

आपल्या मातीचा प्रकार कोणता आहे हे पाहण्याकरिता बागेतील एक मूठभर किंचित ओलसर (ओली नाही) माती घ्या व तिला घट्ट दाबा. आता मूठ उघडा. खालील तीनपैकी एक काही तरी घडेल.

» ‘मातीचा आकार तसाच म्हणजे लाडूसारखा राहील आणि तिला हळूच टोचले तर तिचे तुकडे पडतील याचा अर्थ तुमची माती मिश्र जातीची आहे म्हणजे अगदी चांगली आहे.

» ‘मातीचा आकार तसाच राहील, पण हाताला चिकटूनच राहील. म्हणजे तुमची माती चिकणमाती आहे.

» ‘मूठ उघडल्याबरोबर माती लगेच सांडून जाईल, याचा अर्थ ती रेताड माती आहे.

पाण्याचा निचरा होतो की नाही हे पाहण्याची परीक्षा

तुमच्या मातीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो की नाही हे पाहणेही जरुरीचे आहे. जर मुळे खूप ओली राहिली तर काही वनस्पती मरून जाऊ शकतात. म्हणून पाण्याचा निचरा होण्याची मातीची क्षमता पाहण्याकरिता :

» ‘सहा इंच रुंद व एक फुट खोल खड्डा खणा.

» ‘खड्डा पाण्याने पूर्ण भरा व पाणी वाहून जाऊ द्या.

» ‘पुन्हा त्यात पाणी भरा.

» ‘पाणी वाहून जाण्याकरिता किती वेळ लागतो याकडे लक्ष द्या.

‘जर पाणी वाहून जाण्यासाठी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला तर मातीची पाण्याचा निचरा होण्याची क्षमता चांगली नाही असे समजावे.

मातीमध्ये कीटकांच्या अस्तित्वाची परीक्षा

विशेषत: मातीत पडणा-या जैविक उलाढालीच्या दृष्टीने मातीमध्ये कीटकांचे अस्तित्व हे मातीचे निरोगीपण दाखवणारे महत्त्वाचे निर्देशक आहेत. जर मातीत गांडुळे असतील तर त्याचा अर्थ इतर उपयुक्त सूक्ष्मजीवही तिच्यात आहेत. ज्यामुळे माती चांगली राहते व वनस्पतींची वाढही चांगली होते. कीटकांच्या अस्तित्वाची परीक्षा करण्याकरिता

» माती चांगली तापली आहे व थोडीफार ओलसर आहे. पण गच्च ओली नाही, याची खात्री करून घ्या.

» एक फुट खोल व एक फुट रुंद खड्डा खणून घ्या. पुठ्ठयाच्या तुकडयावर माती बाजूला ठेवा.

» हातांनी माती परत खड्डयात टाकताना नीट तपासून पाहा व गांडुळांची संख्या मोजत राहा.

जर तुम्हाला कमीत कमी १० गांडुळे आढळली तर तुमची माती चांगल्या स्थितीत आहे. त्यापेक्षा कमी असतील तर त्याचा अर्थ तुमच्या मातीमध्ये त्यांची चांगली वाढ होण्याकरिता पुरेसे सेंद्रिय घटक नाहीत किंवा मातीमध्ये आम्लाचे किंवा अल्काचे प्रमाण जास्त आहे.

जमिनीचे प्रदूषण कारणे व उपाययोजना

जमिनीचे प्रदूषण म्हणजे काय?

प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक कारणांमुळे जमिनीचेही प्रदूषण होत असते. जमिनीच्या प्रदूषणामुळे जमिनी नापीक बनतात. जमिनीचे प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे अनेक घटक आहेत.

जंगलतोड

वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी व त्यांची गरज भागवण्यासाठी जास्त इंधन व राहण्यासाठी निवारा या कारणांमुळे जंगलतोड झाली त्या कारणामुळे जमिनी उघडया होऊन जमिनीची धूप होऊ लागली. पर्यावरणाच्या दृष्टीने ३३ टक्केजंगल वनक्षेत्र आवश्यक आहे. परंतु भारतात फक्त २१ टक्केइतके जंगल राहिले आहे.

रासायनिक खतांचा अवाजवी वापर

रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. हे जरी खरे असले तरीदेखील त्याच्या अवाजवी वापराने सूक्ष्म जिवाणूचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे जमिनी कालांतराने नापीक बनत असून त्याचा परिणाम जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर दिसून येत आहे.

जमिनीची धूप

अतिपर्जन्य किंवा विरळ प्रमाणातील जंगले यामुळे जमिनीची मोठया प्रमाणात धूप होत आहे. वरच्या थरातील सुपीक मातीची धूप झाल्यामुळे अशा जमिनी कालांतराने पडीक व उजाड झाल्या आहेत.

अनिर्बंध चराई

चराऊ राने, कुरणे व गायराने अनिर्बंध गुरे चरणीमुळे नष्ट होत गेली आहे.

अनिर्बंध पाण्याचा वापर

पाण्याच्या अनियंत्रित वापरामुळेदेखील बहुतांशी पिकाऊ जमिनी प्रदूषित होत असतात. त्यामुळे शेती उत्पादनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
सेंद्रिय खतांचा वापर

सेंद्रिय खते ही जमिनीचा पोत सुधारण्यास फार महत्त्वाची आहेत. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. तसेच जमिनीची जलधारण क्षमतादेखील वाढते.

रासायनिक औषधांचा वापर

रोग, किडी व तणे नियंत्रणासाठी आज अनेक रासायनिक अवजारांचा, औषधांचा वापर सर्रास केला जातो. परंतु अशा रासायनिक औषधांच्या अमर्यादित वापरामुळे जमिनीतील उपयुक्त सुक्ष्म जीवजंतू, मित्र किड, प्राणी, कीटक दुर्मिळ होऊ लागले आहेत.

उपाययोजना:

खराब जमिनीचे व्यवस्थापन करणे.

आम्लधर्मी जमिनीत आम्लयुक्त खतांचा वापर टाळावा. तसेच क्षारयुक्त जमिनी निर्माण न होण्यास पाण्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या करावे. सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा.

» जंगलतोड थांबवणे व वृक्षांची लागवड करणे.

» अनिर्बंध पाण्याचा व चराईंवर रोख लावणे. पाणी परीक्षण करूनच पाणी सिंचनासाठी वापरावे.

» धूप कमी करण्यासाठी योग्य बांधबंदिस्ती करावी.

» माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करावे.

» नगदी पिकांसाठी एकात्मिक खतांचा वापर करावा.

» हिरवळीच्या तसेच जैविक खतांचा वापर वाढवावा.

कीड व रोग नियंत्रणासाठी शक्य त्या वेळी कडुलिंब, पेंड, तेल, गोमूत्र यांसारख्या नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करावा.


(लेखक कृषीविज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग येथे मृद्शास्त्रज्ञ आहेत)

सौजन्य: ग्रामोदय सहयोगी