देशी गोपालन, एक ध्यास..

By | September 5, 2020

खूप वेळेस देशी गोपालन हे हौस म्हणून अथवा कोणा व्यक्तीस मिळत असलेले आर्थिक बळ पाहून सुरु केले जाते. मुळात ते का करावे? कसे करावे ? याचे उत्तर अनेक लोकांना माहित सुद्धा नसते .
या गोपालनात आमच्या अनुभवाने येणाऱ्या लोकांचे काही प्रकार आहेत

१ ) शेतकरी
२ ) माझ्या मोठ्या बंगल्याच्या द्वारात मला गाय पाहिजे
३ ) दुग्धउत्पादन
४ ) पंचगव्य निर्माण
५ ) स्वयंउत्स्फूर्त

१ ) शेतकरी: हा याचा सर्वात महत्वाचा व मोठा धागा मानता येईल. मातेचा सर्वात जास्त उपयोग हा याच्यासाठीच होऊ शकतो. कारण जर शेती ही आपण कम्पनी समजली तर गोमाता ही त्या कम्पनीचे इंजिन ठरते. आपल्या शेतात निर्माण होणारे गवत आपण तिला घालावे, तिच्या आलेल्या शेण, गोमूत्रातून खत करून जमिनीला घालावे व मिळालेल्या दुधातून अर्थार्जन करावे,
एवढाच साधा हिशोब यांच्या डोक्यात असतो .

२ ) माझ्या मोठ्या बंगल्याच्या द्वारात मला गाय पाहिजे: मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे सर्व सुखसोयी आहेत, दारात बेशकिमती गाडी उभी आहे, सर्व उत्तम आहे. पण आजकाल जो तो गोमाता, गोमाता, म्हणतोय तर ठीक आहे, मला ती सुद्धा दारात हवी आहे. यांच्यात काही गोष्टी उत्तम तर काही अंध:कारमय आहेत .

उत्तम गोष्ट >> त्या आमच्या गोमातेला हे लोक काहीच कमी पडू देत नाहीत. ५ किलो वैरण नाही गुरुजी आज तेवढे खाद्य घालू का? असे प्रश्न या लोकांकडून येतात. कारण हे लोक कोणतेही आर्थिक गणित घालून गोपालन करत नसतात फक्त माझ्या दारात पाहिजे एवढेच यांना अपेक्षित

तोटा >> यांना स्वतःला यातील खूपच कमी माहिती असते, हे सर्व ते एका गड्याच्या जीवावर करत असतात. जो पर्यंत गडी असतो तो पर्यंत सर्व उत्तम चालते , पण जसा गडी जातो तसे यांचा दानशूरपणा उफाळून येतो व ती गाय ते ठराविक व्यक्तीला, संस्थेला दान करतात. त्यांच्या दारात असताना भोगलेले ऐश्वर्य तिला इथे मिळत नाही. फुकट आल्याने स्वभाव दोषाने घेतलेली व्यक्ती सुद्धा खूप आस्थेने सांभाळते असे होत नाही. मग तिच्या जीवनाचे हाल सुरु होतात .

३) दुग्धोत्पादन:
माझा अमुक शहरातील मित्र अमुक एका किमतीमध्ये देशी गाईचे दूध विकतो आहे अथवा घेतो आहे. म्हणजे गाईच्या दुधाला चांगला दर आहे. तर आता मी निवांत आहे अथवा मी नवीन व्यवसाय करायचा प्रयत्नात आहे व हे मला समोर दिसत आहे . तर ठीक आहे आपण सुद्धा हा व्यवसाय सुरु करूया .

आज ५१००० ची गाय घेऊया ,उद्या ती मला १० लिटर दूध देईल व परवा पासून माझे १००० रुपये सुरु होतील. ५१ दिवसात गाय फिटेल. मग २ ,४ ,६, करत वाढवत जाऊ. असा अत्यंत साधेपणाचा विचार यां बिचार्यांच्या डोक्यात असतो. परंतु गाय घेण्यापासून ते १०० रु लिटरला पोचण्यापर्यंत त्या गोपालकाने काय परिश्रम घेतले हे जाणून घ्यायची सुद्धा त्यांची मानसिकता नसते अथवा इच्छा हि नसते .

४) पंचगव्य निर्माण
हा ट्रेंड अलीकडे गोपालनातील खूप महत्वाचा व शाश्वत प्रकार पुनश्च प्रचलित झाला आहे. अनेक गोपालक, गोशाळा चालक, याच्या मुळे सुधारत आहेत स्वावलंबी बनत आहेत. यात आपण गाईच्या मिळणाऱ्या प्रत्येक गव्याचा योग्य वापर करून त्या पासून आर्थिक मोबदला मिळवू शकतो. यातील वस्तूंपासून खूप छान अनुभव अनेक व्यक्ती घेत आहेत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. यात सुद्धा काही गोष्टींबाबत अजागृकता पाहण्यात येते. आम्ही एकदा बार्शी भागात दौरे करत असता आम्हाला २, ३ गोशाळा या पंचगव्य वर आधारित गोपालन करत असताना पाहण्यात आल्या, खूप आनंद वाटला त्यांचे सर्व प्रोडक्त्त बघून त्यांच्या आयडिया ऐकून, पण जसे आमच्या नजरेत माता आल्या तसे आम्ही खूपच बेचैन झालो . खूप अशक्त धक्का बसला तरी पडतील अश्या कृश झाल्या होत्या. त्या मनाने, वयाने, चेहऱ्याने, तरुण असलेल्या माझ्या माता शरीराने अगदीच वयोवृद्ध झाल्या होत्या. सविस्तर चर्चेने असे काही नवे निष्कर्ष समोर आले जे कष्टदायक होते . यातील अनेक गोमाता वर्षानुवर्षे गाभच घालवल्या नव्हत्या कारण त्यांच्या मतानुसार त्यांना फक्त शेण, गोमूत्र अपेक्षित होते. त्यांच्या मानसिकतेप्रमाणे दूध देणाऱ्या गाईच्या शेण मूत्रात औषधी गुणतत्व राहत नाहीत. हे महत्वाचे कारण व दूध काढण्यासाठी कोणी इच्छुक नसते हे चमत्कारिक कारण समोर आले .

दूध नसल्याने खाद्य नाही, खाद्य नसल्याने अंगात ताकद नाही, ताकद नसल्याने त्या हीट वर येत नाहीत, हीटवर न आल्याने त्या गाभ जात नाहीत. गाभ जात नसल्याने यांना कंटाळा आला की त्यांना ….. च्या दारात बलिदानासाठी उभ्या केल्या जातात, ही वस्तुस्थिती आहे…

५) स्वयंउत्स्फूर्त
हे लोक एका ध्येयाने, वेडाने, जिज्ञासेने जागृत झालेली असतात. या व्यक्ती कोणी सांगतो म्हणून किंवा काही ऐकिवात आहे म्हणून गोपालनात आलेला नसतो तर त्याच्या मनात निर्माण झालेल्या समुद्रमंथनातील एका रत्नाच्या रूपाने तो समोर आलेला असतो. या लोकांना गाईपासून कधीच काहीच नको असते, ते फक्त आणि फक्त त्यांच्या साठीच आयुष्य वेचतात. काय कमवतात काय नाही त्यांनाच माहीत. पण एक नक्की या व्यक्ती इतके पुण्य कमवतात व मातेचे इतके आशीर्वाद मिळवतात कि त्या व्यक्ती पैसा, मोबदला, या शब्दांच्या कित्तेक पलीकडे जाऊन पोचतात. आजसुद्धा अनेक ध्यासवेढे आमच्या गोशाळेला भेट देण्यासाठी येत असतात पाहून, त्यांचे विचार ऐकून आनंद वाटतो व एक नवी उमेद, दिशा, जिद्द, प्रेरणा आम्हाला देऊन जातात ज्याने नव्या जोमाने आम्ही पुनश्च्च गोपालनात रुजू होतो आणि एक यशस्वी गोपालक म्हणून समाजासमोर उभे राहतो .

यातील आपण कोण आहोत हे ठरविणे महत्वाचे आहे व प्रत्येक पैलूमधील जे दोष आहेत ते बाजूला सारून चांगले गुण एकत्र करून आपण सुद्धा या गोपालनात कसे यशस्वी होऊ शकतो याचे सूत्र बांधून या देशी गोपालनाला सुरवात करावे .

आपल्यापैकी आपल्यातीलच एक गोपालक

मोरया गोसंवर्धन
रजि. महा.४३४/१६-सांगली
९८९००८२०४५
वाटेगाव