जल संवाद
भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय लोक ज्या जलविज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन गरजांसाठी करीत त्याचा थोडक्यात आढावा ह्या लेखात घेण्याचे योजिले आहे. तारापूरचे जेष्ठ अभियंता व प्राचीन शास्त्रांचे जाणकार कै. गो. ग. जोशी यांनी या विषयावर बरेच काम केले होते. त्यावर आधारीत त्यांचा लेख सन 1955 मध्ये शिल्पसंसार ह्या हिंदी मासिकात प्रसिध्द झाला होता. सदर लेख लिहितांना त्या लेखातील माहितीचा बराच वापर केला आहे. कृतज्ञतापूर्वक मी त्यांचे ऋण नोंदवून ठेवतो.
पृथ्वी (जमीन), आप (पाणी), तेज (प्रकाश), वायु (हवा) आणि आकाश (पोकळी) ही पाच मूळतत्वे असून त्यापासून इतर सर्व गोष्टी तयार होतात असे भारतीय प्राचीन ज्ञान मानत आले आहे. त्यांनाच पंचमहाभूते असे म्हणतात. ही पंचमाहाभूते कशी निर्माण झाली हे चारही वेदांमध्ये अत्यंत बारकाईने अभ्यासलेले आहे. कै. गो. ग. जोशी तर वेदांना ह्या काळातले ज्ञानकोशच मानतात. त्या दृष्टीने वेदांसारख्या प्राचीन ग्रंथांचा पुन्हा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे.
मित्रवायु (ऑक्सिजन) आणि वरूणवायु (हायड्रोजन) यांच्या संयोगातून पाणी तयार होते हे ज्ञान भारतीयांना वेदकालापासून होते.
आपोहिष्टामयो भुव:स्तान् उर्जे
दधातन महेरणाय चक्षसे। ऋग्वेद 10-15
हे पाण्याचे आपोहिष्ट स्तोत्र बहुधा सगळ्या संस्कृत जाणणाऱ्यांना माहित असते. पाणी ही मूलभूत गरज आहे. त्यापासून उर्जा मिळते. त्यामुळेच प्रगतीही करता येऊ शकते असे अनेक उल्लेख त्यात आढळतात.
अथर्व वेदाचा एक उपवेद म्हणजे स्थापत्यवेद ! (टीप अथर्ववेदाला ऋग्वेद समजले जातात. स्थापत्यवेद, आयुर्वेद आणि नाट्यवेद अर्थात भरताचे नाट्यशास्त्र) आज त्याची प्रत भारतात उपलब्ध नाही. मात्र त्यावरच्या टीका तसेच परिशिष्टे सापडतात त्यात “तडागविधी” म्हणजे जलाशयनिर्मिती असे प्रकरण आहे.
यजुर्वेदामध्ये चौथ्या अध्यायात सिंचनासाठी नदीचे पाणी, तसेच खोदलेली विहीर (बांधलेली विहीर) कालवे, लहान तळी, नेसर्गिक तलाव, बांधकाम करून निर्माण केलेली सरोवरे व जलाशय यांचेबद्दल सविस्तर विवेचन सापडते. निर्मिती आणि वापर ह्या दोन्ही दृष्टींनी येथे विचार मांडलेला आढळतो.
वशिष्ठ शिल्प संहिता हा मूलत: जलशास्त्र व नौकानयनासंबंधीचा ग्रंथ होय. त्यात पाणीवापराच्या पध्दतींवर सविस्तर टिपण आहे. त्याचा संदर्भ काही ठिकाणी यजुर्वेदातही घेतलेला आढळतो.
अथ जलाशयो प्रारम्यते….। ह्या वाक्याने सुरू होणाऱ्या ग्रंथामध्ये (ग्रंधाला नाव नाही, शेवटचे पान नाही त्यामुळे कर्ता कोण तेही समजत नाही) भिंत बांधून जलाशय कसा निर्माण करावा याचे सविस्तर वर्णन आहे. हा ग्रंथ सुमारे 2800 वर्षांपूर्वीचा आहे.
कृषी पाराशर, कश्यप कृषीसूक्ती, वृक्ष आयुर्वेद, विश्ववल्लभ (हा ग्रंथ इतर ग्रंथाचे मानाने बराच अलिकडच्या काळातील आहे) सहदेव भाडळी ह्या ग्रंथामध्ये जलसाठवण, जलवाटप, पर्जन्यानुमान, तडागनिर्मिती ह्या विषयी सविस्तर विवेचन आढळते.
नारदशिल्पशास्त्रामध्ये जलाशय – तडागलक्षण (लक्षण म्हणजे गुणधर्म) ह्याचा स्थापत्याचेदृष्टीने विचार केलेला आहे, त्याखेरीज जलदुर्ग म्हणजे सागरातील किल्ले आणि वाहिनीदुर्ग म्हणजे नदीतील किल्ले. तसेच प्रणालीसेतू म्हणजे कमानीचा पूल याबद्दलही विवेचन आहे.
भृग शिल्पशास्त्र संहितेमध्ये
अ) स्तंभन विद्या (साठवण- Storage)
ब) संसेचन विद्या (वाटप – Distribution)
क) संहारण विद्या (निचरा – Drainage)
अशा तीन प्रकरणांमधून पाण्याचा अभ्यास केला आहे. पाणी सहजपणे साडेसहा महिने साठविता येते असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे. ते पाण्याचे दहा गुणधर्म मानून त्याचे विवेचन करतात.
पाराशरमुनी मात्र पाण्याला एकोणावीस गुणधर्म असल्याचे सांगतात. सहा नियम व काही मार्गदर्शक सूत्रे यातून त्यांचा अनुभव घेता येतो असेही ते नोंदवून ठेवतात.
याखेरीज विविध पुराणांमध्ये व नीतीशास्त्रांमध्ये जलस्थापत्यासंबंधी उल्लेख आढळतात. विश्वकर्मा शिल्पशास्त्र, शुक्राचार्य संहिता, मयमत यामध्ये विहीरी त्यांची जागा, त्यातील जलउपलब्धी, कालवे यावर वर्णन केलेले आढळते.
इ.सनाच्या सहाव्या शतकात (इ.स.550) वराहामिहीर हा प्रसिध्द शास्त्रज्ञ होऊन गेला. बृहतसंहिता हा त्याचा महत्वाचा ग्रंथ. ह्या ग्रंथातला एकूणपन्नासावा अध्याय दकर्गलम्। भूगर्भातले पाणी कसे शोधावे यावर आपल्या पूर्वजांना काय माहिती होती याचा हा पहिला लेखी आढळणारा उल्लेख. वृक्ष त्याचेजवळ असलेले वाकळ आणि त्यात रहाणारा प्राणी आणि तिथली माती यांचा अभ्यास करून त्यावृक्षाजवळ भूगर्भात किती खोलीवर पाणी लागेल. पाणी किती प्रमाणात लागेल तसेच त्या पाण्याची गुणवत्ता कशी असेल यासाठी त्रेपन्न श्लोकांमध्ये त्रेपन्न सूत्रे दिली आहेत. विशेष म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी आंध्रमध्ये एका विद्यापीठाने ह्या सूत्रांनुसार 300 विहीरी खोदल्या. त्यापैकी 290 विहीरींना ग्रंथात वर्णन केल्यानुसार पाणी आढळले. हे 97 टक्के यश म्हणजे फारच आश्चर्यकारक निकाल समजावयाला हवा.
कौटिलीय अर्थशास्त्र हा एक महत्वाचा ग्रंथ. इ.स.पूर्व 300 चे आसपास लिहिलेला. कालव्याने सिंचन, कालव्याजवळ खोदल्या विहीरीने सिंचन, स्वतंत्र विहीरीवरून पाण्याचा वापर यांचे बद्दल विचार मांडतांना राजाने शेतकऱ्यांकडून पाणी वापराबद्दल किती कर घ्यावा हे त्याने ग्रंथात नोंदवून ठेवले आहे. त्यावरून सिंचनाच्या ह्या सर्व पध्दती त्याकाळी प्रचलित होत्या आणि त्यापासून किती आर्थिक फायदा होतो याचाही त्यांचा अभ्यास होता हे जाणवते.
नारदस्मृतीमध्ये नारद आणि धर्मराज यांचा संवाद आहे. नारद राजाला विचारतात – हे राजा, तू पावसाचे पाणी साठवून ठेवायाला पुरेशी काळजी घेतोस का? जमिनीवर पडलेले पाणी नद्यांतून वाहून जलाशयापर्यंत पोहोचते ना? साठवून ठेवलेल्या पाण्याची नासधूस तर होत नाही ना? पाणी हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे बंधाऱ्यांना भेगा पडून त्याची नासाडी होऊ नये म्हणून पुरेशी काळजी घेतली पाहिजे. वहात असलेले आणि साठविलेले दोन्ही अवस्थेतील पाणी काळजीपूर्वक संभाळले पाहिजे. पाणी साठविणे, वाहून नेणे, संभाळणे, धरणाची देखभाल आणि पाण्याचे महत्त्व ह्या सगळ्याच गोष्टी महाभारत काळात किती महत्त्वाच्या मानल्या जात, याचेच हे महत्त्वाचे उल्लेख!
राजा भोज लिखित समरांगण सूत्रधार (सन 1000 ते 1055) आणि भुवनदेव लिखीत अपराजित पृच्छा (सन 1175 ते 1250) ह्या दोन महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये जलाशय निर्मितीची चर्चा आढळते. वेगवेगळे विहीरींचे प्रकार उल्लेखलेले आढळतात. साधी विहीर, वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर, तडाग म्हणजे तलाव, कुंड म्हणजे मंदिरासमोरील सरोवर अथवा उथळ हौद, लहान विहीर किंवा आड ह्याला कुपिका म्हणतात.
बारव, पुष्करिणी किंवा पोखरणी, असे वेगवेगळ्या प्रकारचे जलाशय निर्माण होत असत अशी नोंद प्रा. डॉ.अरूणचंद्र पाठक यांनी ‘महाराष्ट्रातील बारव स्थापत्य’ ह्या ग्रंथात केलेली आहे.
हे झाले लिखित स्वरूपात सापडलेले उल्लेख! प्रत्यक्ष पहाणी केली तर असे अनेक तलाव, विहीरी, पुष्करणी महाराष्ट्रभर विखुरलेल्या आढळतात. अनेक आकाराचे, वेगवेगळ्या बांधणीचे हे जलाशय प्राचीन जलस्थापत्य किती प्रगत होते याची जाणीव करून देतात.
दौलताबादच्या किल्ल्यावर वक्रनलिका पध्दतीने पाणी नेण्याचा यशस्वी प्रयोग, बऱ्हाणपूरचा खुली भंडारा, औरंगाबादची थत्ते नहर, बहादरपूरची विशिष्ठ पाणीपुरवठा पध्दत, कुंभल गडावर (राजस्थान) तळापासून वरपर्यंत पाणी चढविले आहे ती पध्दत यामुळे वक्रनलिका जेट, हैड्रोलिक रॅम ह्या तंत्रज्ञानाचे आपल्या पूर्वजांना पुरेसे ज्ञान होते याचे प्रत्यक्षदर्शी पुरावेच म्हणावयाला हवेत.
कच्छमध्ये उत्खननात सापडलेले हरप्पाकालीन शहर ढोलविरा! त्या शहराला पक्केगटारे व पाणीपुरवठ्याचे नळ आहेत आजही ते जाऊन पहाता येतात.
अशा पध्दतीची अनेक उदाहरणे लिहिता येतील. तथापि ही यादी लिहित बसण्याएैवजी कोणकोणत्या दृष्टीकोनातून आपले पूर्वज पाण्याबद्दल अभ्यास करीत असत याची नोंद करून मी थांबणार आहे. डॉ. गोरे, पी. एच. थत्ते आणि के. वेंकटरमण ह्या तिघांनी ह्या दृष्टीकोनातून अभ्यास करून सोळा उपकरणांची नोंद केलेली आहे.
- जलर्गल (जलस्त्रोत निश्चित करणे)
- जलर्गलयात्रा (पाणी काढण्याचे / उपसण्याचे साधन)
- जलाशयोत्सर्ग (वितरण प्रणाली)
- जलाशयोत्सर्ग पध्दती (वितरण पध्दत)
- जलाशयोत्सर्ग प्रयोग (वितरण शास्त्र)
- जलाशययोत्सर्ग प्रमाणदर्शन (वितरण जलमोजणीपध्दत)
- जलाशयोत्सर्ग संधी (वितरण प्रक्रिया रीत)
- जलाशयोत्सर्ग तत्व (वितरणा मागची तत्वे)
- जलाशय रामत्सर्ग (गाळ – Silting)
- जलाशय कालनिर्धारण (जलाशयाचे आयुर्मान)
- तडाग प्रतिष्ठा (सरोवर निर्मिती स्थापना)
- तडाग उत्सर्ग (तलावातील पाण्याचा बाह्यगामी मार्ग)
- जलाशय रामत्सर्ग पध्दती ( गाळ साचण्याची प्रक्रिया – Method of silting)
- जलाशय रामत्सर्ग मयुख (गाळ साचण्याची काळबध्दनोंद – Mannual)
- वास्तु रत्नाकर (वास्तुकोष) आणि
- कुपडी जलस्थान लक्षण (विहीर व तिचे स्थान)
अशारीतीने जलाशय निर्मिती, देखभाल, गाळ, वितरण व त्यामागील इतस्त्र सर्व बाबींची नीटशी नोंद इतक्या प्रकारे पाणी ह्या विषयाबद्दल अनेक मंडळी काम करीत होती. आपापल्या पध्दतीने लिहून ठेवीत होती. गेली 2800 वर्षे हा प्रवास आणि अभ्यास ह्या रीतीने सुरू आहे. तो ठिकठिकाणी नोंदवून ठेवलेला आहे म्हणून आपणास तो निदान कळतोय तरी!
ह्या प्राचीन शास्त्राची प्रगती होत होत आपण आज आहोत त्या स्थानापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. त्यामुळेच जेव्हा अनेक स्त्रोत्रांमधून प्रार्थनांमधून पाण्याचे उल्लेख सापडतात तेव्हा आनंदाने व अभिमानाने डोळ्यात आनंदाश्रू जमा होतात.
सौजन्य: एक ग्रामोदय सहयोगी