हळद लागवड

By | September 5, 2020

भारतीय मसाल्यांमध्ये हळद एक महत्वपूर्ण मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे.

जमिनीची मशागत:

जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्केपेक्षा जास्त असावे.
जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी.
कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यासाठी जमिनीची उभी – आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
दोन नांगरणीमधील अंतर कमीत कमी १५ दिवसांचे ठेवावे.
त्यासाठी जमिनीची उभी-आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके ( ताग, धैंचा) गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी.
भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो हळद लागवडीसाठी टाळाव्यात.
जमिनीमधील लव्हाळा, हराळी यांसारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.
तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात.

बेण्याची निवड:

बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी.
बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत.
बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे.
बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे.
बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते.
मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे.
बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी.
बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे.

बियाण्याचे प्रकार :

हळदीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे बियाणे लागवडीसाठी वापरतात.

मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे : या प्रकारचे बियाणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ११ ते १२ क्विंटल बियाणे लागते.

बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे : मुख्य रोपाच्याबाजूला जे फुटवे येतात, त्याच्या खाली जे कंद तयार होतात. त्यास बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे असे म्हणतात. या कंदाचे वजन ४० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० क्विंटल बियाणे लागते.

हळकुंड : ओली हळकुंडेही बियाणे म्हणून वापरू शकतो; परंतु त्यांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ९ ते १० क्विंटल बियाणे लागते. सुरवातीला बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने या प्रकारचे बियाणे उत्तम आहे, परंतु मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते.

हवामान व लागवड :

बदलत्या हवामानाचा हळद पिकाच्या वाढीवर फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही. हळद हे नऊ महिन्यांचे पीक असून, याची लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्याच्या सुरवातीपासून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड करतात. हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणतः एक फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे एक फूट खोलीवरील मातीपरीक्षण केल्यास फायदेशीर ठरते.

खत व्यवस्थापन :

कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळी अगोदर एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सद्यःस्थितीमध्ये शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने गांडूळखत, कंपोस्ट खत, मासोळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेस मड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींचे मिश्रण याचा वापर करावा. हळदीसाठी शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा. जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करावा.

सुधारित जाती

१) फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.

२) सेलम : या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे.

३) कृष्णा (कडाप्पा ) : या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्‍यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असून झासांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकून पिकाच्या कालावधीमध्ये १० ते १२ पाने येतात. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास ही जात अल्प प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ ६ ते ७ सें.मी. असते. या जातीच्या वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७५ ते ८० क्विंटल प्रती हेक्टरी येते. ही जात हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन १९८४ साली कडाप्पा जातीमधून निवड पद्धतीने काढण्यात येऊन शेतकर्‍यांना लागवडीसाठी प्रसारित केली आहे.

४) राजापुरी : या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात. या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बर्‍याच वेळा हळदीच्या वायदे बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो. महणून ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.

५) खाण्याची हळद (Curcuma Longa ) : ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो.
पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात.
फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६% लागवड भारतात होते.

६) कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने लांब – वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.

७) इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot) : मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्रा, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते. कंदातील स्टार्च १२.५ % असून त्याचा उपयोग खर्‍या अॅरोरूटला पर्याय म्हणून तसेच मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.

८) आंबेहळद (Curcuma Amada) : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात.
बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट – पांढरी असून बोंड तीनधारी असते.
औषधी उपयोग : कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.

९) काळी हळद (Curcuma Caesia) : बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये ९.७६% सुवासिक तेल असते.

१०) कचोर (Curcuma Zedoria) : वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानांचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो.

पूर्व मशागत :

हळद लागवडीमध्ये पूर्वमशागतीच्या कामामाध्ये नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाणे खणून ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची ट्रॅक्टर ने १८ ते २२ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. पहिल्या नंगारटीनंतर शेतात नंगारटीमधून चुकलेल्या कडा १ फुटांपर्यंत टिकावाने खणून घ्याव्यात. त्याचवेळी जमिनीमधील कुंदा, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.
पहिल्या नंगारटीनंतर शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून घ्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

हळद लागवडीच्या पद्धती

१) सरी वरंबा पध्दत : हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागावाद करावयाची झाल्यास ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सर्‍या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्‍याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.

२) रुंद वरंबा पध्दत : रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे दिसून येते..

सौजन्य : ग्रामोदय सहयोगी