आंबा मोहोर संरक्षण

By | September 6, 2020

दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होतांना दिसून येते. पावसाळ्यात आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले तर अशा आंब्याच्या झाडाला उशिरा मोहोर येण्याची दाट शक्यता असते. आंब्याची फुले १० ते ४० सेंमी लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिमी एवढी असे. आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. प्रमुख व दुय्यम पोषण द्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव या सारख्या कारणांमुळे मोहोर गळ आणि फुलगळ होते.आंबा पिकावर येणा-या विविध महत्त्वाच्या रोग व किडीबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.

तुडतुडे :– या किडीची मादी कोवळ्या पानांच्या आणि मोहोराच्या पेशीमध्ये, डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये सुमारे २०० अंडी घालते. पूर्ण वाढलेले आणि अपूर्णावस्थेतील तुडतुडे आंब्याच्या मोहोरातील कोवळ्या फुटीमधील तसेच लहान फळांमधील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर आणि लहान फळे गळून पाडतात. या किटकांनी रस शोषण्यासाठी पाडलेल्या भोकामधून झाडांचा चिकट अन्नद्रव बाहेर पडतो. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मितिच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन वाढीवर तसेच फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.

शेंडा पोखरणारी आळी :-आळी आंब्याच्या झाडाच्या कोवळ्या फुटीवर, तसेच मोहोरावरही आढळते. ऑगस्ट ते सेप्टेंबर या काळात कीडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीची अळी पानांच्या देठापासून कोवळ्या फांदीत शिरते. मोहोर पोखरला गेल्यामुळे तो सुकतो. मोहोर फुटण्यापूर्वीच जर अळी आत शिरली तर मोहोर फुटण्याची क्रिया थांबते.

मिजमाशी :– मोहोर तसेच पालवी फुटताच कोवळ्या दांडयामध्ये अंडी घालते, दोन ते तीन दिवसांत अंडी उबून आळी मोहोरा च्या देठातील आतील भाग खाते, त्या ठिकाणी सुरवातीस लहान गाठ आल्याप्रमाणे दिसते. प्रादुर्भित मोहोर वाकडा झालेला दिसून येतो. कोवळ्या पालवीवर प्रादुर्भाव झाल्यास पाने काळी पडून गळून जातात.

भुरी :– या रोगामुळे मोहोराचा देठ, फुले आणि लहान फळे यावर सूक्ष्म बुरशीची वाढ होते, त्यामुळे प्रादुर्भित भाग पांढरट, भुरकट दिसतो. रोगाचा प्रसार वा-यामुळे होतो. फुले व लहान फळे गळून पडतात आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.

■ आंबा मोहोर संरक्षणासाठी वेळापत्रक:
२० ते २५ नोव्हेंबर दरम्यान मिथिल डिमॅटॉन २० मिली + ८०% सल्फर २० ग्रॅम + १० लिटर पाणी.
१ ते ५ डिसेंबर दरम्यान नुवान २० मिली + प्रोपिकोनॅझॉल ५ मिली + डायकोफॉल २० मिली + १० लिटर पाणी.
२० ते २५ डिसेंबर दरम्यान कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम + स्पिनोसॅड ५ मिली + १० लिटर पाणी
फळे साधारणपणे ज्वारीच्या आकाराची झाल्यानंतर जिब्रॅलीक ऍसीड १ ग्रॅम + ऍसिटोन ६० मिली + अल्कोहोल १०० मि ली किंवा जिओ सुपर १५० मिली + १ किलो युरिया + चिलेटेड झिंक २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.

याप्रमाणे फवारण्या करून घ्याव्यात. वातावरणातील बदलानुसार फवारणीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जेथे कल्टारचा वापर बागेमध्ये करण्यात आलेला आहे तेथे विशेषतः रासायनिक खतांचे व्यवस्थापन, पिक संरक्षण आणि पाणी व्यवस्थापन या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गरजे प्रमाणे आपल्या नजीकच्या तज्ञास संपर्क साधून अधिकची माहिती घ्यावी.

माहिती सौजन्य: ग्रामोदय सहयोगी